नौसेनिकांचा उठाव हा साम्राज्यवादी इंग्रज सत्तेवर केलेला शेवटचा प्रहार होता. सशस्त्र क्रांतिकारकांनी दिलेला हा जबरदस्त धक्का होता. तत्कालीन अहिंसक लढ्याच्या सेनानींनी या उठावाला महत्त्व दिले नसले तरी या उठावाने इंग्रजी सत्तेला जबर हादरा दिला होता.
उठावाचे वृत्त दि. 18 फेब्रुवारी 1946 रोजी इंग्लंडमध्ये समजले आणि दुसर्याच दिवशी सेक्रेटरी ऑफ स्टेट्स फॉर इंडिया, लॉर्ड पेथिक लॉरेन्स यांनी हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये आणि पंतप्रधान ऍटली यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्रिमंत्री शिष्टमंडळ नेमल्याची घोषणा केली.
ही घोषणा करत असताना ऍटलींनी सभागृहात सांगितले की, भारतात आपण ज्वालामुखीच्या तोंडावर आरढ झालो आहोत!
उठावात सहभागी झालेल्या नौसैनिकांनी हिंदी जनतेला सांगितले होते, ‘‘आम्हा सैनिकांची अस्मिता आता जागी झाली आहे. आम्हालाही स्वातंत्र्याची आस आहे. ते मिळवण्यासाठी आम्ही सैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत.’’
आणि इंग्रजी सत्तेला बजावले, ‘‘आता आम्ही तुम्हाला साथ देणार नाही, आमच्या बांधवांविरुद्ध आम्ही शस्त्र उचलणार नाही. तुम्ही हा देश सोडून चालते व्हा!’’
हे सारं कसं नि कसं घडलं?
या ऐतिहासिक सत्य घटनेवर साकारलेली मराठीतील ही पहिलीच कादंबरी होय.