मॅजेस्टिक गप्पा

मे 1973 मध्ये पुण्यात ‘मॅजेस्टिक गप्पां’ना प्रारंभ झाला. ‘मॅजेस्टिक साहित्यिक गप्पा’ म्हणून सुरू झालेल्या या गप्पांचे स्वरूप सुरुवातीला निखळ वाङ्मयीन होते पण कालांतराने सामाजिक-राजकीय-आर्थिक प्रश्न, आरोग्य, लेखक-कलावंतांच्या मुलाखती असे गप्पांचे स्वरूप बदलले. ‘मॅजेस्टिक’तर्फे होणार्‍या गप्पांचे लोण महाराष्ट्रभर पसरले. 1984 पासून विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघा’च्या सहकार्याने दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘मॅजेस्टिक गप्पां’चे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रांतील नामवंत या गप्पांमध्ये आवर्जून सहभागी होतात. 2008 च्या जानेवारी महिन्यात पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या ‘गप्पा’ पार्ल्याच्याच नव्हे तर, मुंबईच्या सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे अंग बनल्या आहेत. महाराष्ट्रात रसिकप्रिय ठरलेल्या या वाङ्मयीन उपक्रमाचे श्रेय नि:संशयपणे केशवराव कोठावळे यांना दिले जाते.