परिचय

‘मॅजेस्टिक’चे संस्थापक (कै.) केशवराव कोठावळे यांनी गिरगावच्या फूटपाथवर पुस्तकविक्रीला सुरुवात केली. १९४२ साली ‘औदुंबराच्या छायेत’-गिरगाव नाक्यावर ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ या नावाने पुस्तक-विक्री दुकान सुरू केले. नंतर गिरगावातच सुरतवाला बिल्डिंगमध्ये दुसरे दुकान सुरू झाले. त्यानंतर दादर-पुणे-ठाणे असा दुकानांचा विस्तार झाला.

१९४८ साली ‘चंद्रकन्या’, ‘ठेंगूचे पराक्रम’, ‘जाड्या-रड्या’, ‘वासिलीचे भाग्य’, ‘विदिशेची राजकन्या’, अशी छोट्या मुलांसाठी पुस्तकेही केशवराव कोठावळे यांनी लिहिली आणि ‘केशव कोठावळे प्रकाशन’ या नावाने प्रसिद्ध केली. १९५२ साली ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ची स्थापना झाली. ‘विवाहानंतर’ हे श्रीमती मालतीबाई दांडेकर यांचे पुस्तक हे ‘मॅजेस्टिक’चे पहिले प्रकाशन. हळूहळू सर्वश्री गो. नी. दाण्डेकर, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, वि. स. वाळिंबे, अनिल अवचट, सुभाष भेण्डे, ह. मो. मराठे, वसंत सरवटे, भारत सासणे, मुकुंद टाकसाळे, यांसारखे अनेक मान्यवर साहित्यिक ‘मॅजेस्टिक’शी जोडले गेले. रंगनाथ पठारे, अनंत सामंत, राजन खान, निरंजन उजगरे, संजीव लाटकर, सदानंद देशमुख यांसारखे अनेक लेखक ‘मॅजेस्टिक’च्या यादीत नंतर समाविष्ट झाले.

ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह’ या विषयांना वाहिलेल्या ‘ललित’ मासिकाची सुरुवात केशवराव कोठावळे यांनी १९६४ साली केली. केशवराव कोठावळे यांनी पुणे येथे तीन मजली ‘मॅजेस्टिक’ची वास्तू उभारल्यानंतर दुसर्‍या  मजल्यावर उभारलेल्या ग्रंथदालनात रसिकांनी यावे या हेतूने ‘मॅजेस्टिक बिल्डिंग’च्या गच्चीवर १९७३ मध्ये ‘मॅजेस्टिक गप्पां’ना सुरुवात झाली.

मुंबईत १९८४ साली पार्ले येथेही ‘मॅजेस्टिक गप्पां’ना प्रारंभ झाला. दिवाळी अंकांमध्ये मानाचं स्थान असलेले ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांचे ‘दीपावली’ वार्षिक १९७८ सालापासून केशवराव कोठावळे यांनी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ‘मॅजेस्टिक’ने ललितवाङ्‌मयाबरोबरच आरोग्य, मानसशास्त्र, पाककला, धार्मिक, इतिहास, व्यवस्थापन, क्रीडा, युद्ध, खास स्त्रियांसाठी, इंग्रजी संभाषण अशी विविध विषयांवरची पुस्तकं प्रसिद्ध करीत असते, आणि त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद ‌लाभतो आहे.

‘सत्तांतर’-व्यंकटेश माडगूळकर, ‘स्मरणगाथा’- गो. नी. दाण्डेकर, ‘ताम्रपट’- रंगनाथ पठारे या ‘मॅजेस्टिक’च्या पुस्तकांना ‘साहित्य अकादेमी’ पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, दमाणी पुरस्कार, केशव भिकाजी ढवळे, बा. ग. ढवळे, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ यांसारखे आणखी अनेक पुरस्कार ‘मॅजेस्टिक प्रकाशन’च्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत. मराठी प्रकाशन क्षेत्रात मानाचे मानले जाणारे `वि. पु. भागवत पारितोषिक’ ‘मॅजेस्टिक’ला मिळाले, तसेच २००४ साली औरंगाबाद येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेना’त श्री. अशोक कोठावळे यांना ‘उत्कृष्ट प्रकाशना’चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘काव्यपर्व’ हा देशी भाषेतील स्वातंत्र्योत्तर भारतातील निवडक अनुवादित कवितांचा संग्रह, तसेच ‘महाराष्ट्राबाहेरील मराठी’ हा संग्रह निरंजन उजगरे यांनी संपदित केला. ‘मराठी कथा : विसावे शतक’हा प्रा. के. ज. पुरोहित आणि प्रा. डॉ. सुधा जोशी यांनी संपादित केलेला कथासंग्रह मराठी कथेच्या वाटचालीचे काही टप्पे दर्शवतो. दिवाळी अंकांतील निवडक साहित्याचं संकलन असलेले दोन खंड ‘अक्षर दिवाळी’ या नावाने १९८५, १९८६ साली प्रसिद्ध केले.

‘ललित’ मासिकातर्फे ग्रंथप्रसारार्थ अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. ‘दीपावली’ने अनेक कादंबरी स्पर्धा आयोजित केल्या. ‘मॅजेस्टिक’ने आयोजित केलेल्या कादंबरी स्पर्धेतून ‘चक्र’ ही जयवंत दळवी यांची कादंबरी प्रसिद्ध केली. ‘राजकीय कादंबरी स्पर्धा’ही मॅजेस्टिकने घेतली होती.

‘मॅजेस्टिक प्रकाशन’चे संस्थापक केशवराव कोठावळे यांचे १९८३ साली निधन झाले १९८५ सालापासून ५ मे या त्यांच्या स्मृतिदिनी ‘केशवराव कोठावळे पारितोषिक’ सर्वोत्कृष्ट ग्रंथाला दिले जाते. रोख रु.१५,१५१ आणि स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. या पारितोषिकप्राप्त ग्रंथाच्या प्रकाशकाचाही मानचिन्ह देऊन सन्मान केला जातो. तसेच ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ १६ सप्टेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी ‘जयवंत दळवी स्मृतिपुरस्कार’ ‘मॅजेस्टिक’ तर्फे दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी अनुक्रमे कादंबरी, नाटक, विनोदी लेखन या वाङ्‌मयप्रकारांसाठी दिला जातो. रोख रुपये ११,१११ आ‌णि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘मॅजेस्टिक’चे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या निधनानंतर श्री. अशोक कोठावळे ‘मॅजेस्टिक’चे संचालक म्हणून काम पाहत आहेत. आतापर्यंत सुमारे १५०० च्या वर पुस्तके ‘मॅजेस्टिक’ने प्रकाशित केली आहेत.