दीपावली

दिवाळी अंकांमध्ये मानाचं स्थान असलेले ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या ‘दीपावली’ वार्षिकाची मालकी १९७८ सालापासून केशवराव कोठावळे यांच्याकडे आली. मराठीतील अनेक नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदितांच्या साहित्यालाही ‘दीपावली’त आवर्जून स्थान असते. ‘दीपावली’मधून ‘व्यंगचित्र स्पर्धा’, ‘हास्यचित्र स्पर्धा’, ‘कादंबरी स्पर्धा’ सुरू केल्या. यातून अनेकानेक चांगले लेखक, व्यंगचित्रकार मराठी साहित्याला मिळाले. त्या त्या वर्षातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित ‘लेखमाला’ आणि या ‘लेखमाले’त त्या त्या विषयावरील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग हे ‘दीपावली’चे आजवरचे वैशिष्ट्य आहे. मुखपृष्ठावर वेगवेगळे प्रयोग ‘दीपावली’ने केले आणि ही मुखपृष्ठे पारितोषिकप्राप्त ठरली. ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ’, ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ’, ‘सीतादेवी सोमाणी प्रतिष्ठान’, ‘रामशेठ ठाकूर सामाजिक विकास संस्था’ यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार ‘दीपावली’ने आजवर मिळविले आहेत. चोखंदळ वाचकांच्या ‘निवडी’त ‘दीपावली’ अग्रक्रमावर असतो.