ललि‌त मासिक

ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने १९६४ साली ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह’ या विषयांना वाहिलेल्या ‘ललित’ या वाङ्‌मयीन मासिकाची सुरुवात झाली. ग्रंथप्रसाराच्या दृष्टीने ‘ललित’ने अनेक उपक्रम राबविले. साहित्यविषयक अनेक स्पर्धा ‘ललित’ घेत असते आणि त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. ‘दिवाळी अंकांनी आम्हांला काय दिले?’, ‘दिवाळी अंकांकडून काय अपेक्षा’, ‘वाचन आणि स्मरण’ यांसारख्या अनेक स्पर्धा ‘ललित’ने घेतल्या. ‘ललित शिफारस’, ‘मानाचे पान’, ‘लक्षवेधी पुस्तके’, ‘वाचन आणि स्मरण’ यांसारखी ‘ग्रंथप्रसारा’च्या दृष्टीने अनेक सदरे ‘ललित’मधून सुरू केली. ‘लेखकाचे घर’, ‘दशकातील साहित्यिक’, ‘स्वागत’, ‘ठणठणपाळ’, ‘काय लिहिताय?, काय वाचताय?’, ‘गोमा गणेश’, ‘अलाणे-फलाणे’, ‘चोखंदळ वाचकांची निवड’, ‘सप्रेम नमस्कार’, ‘दृष्टिक्षेप’, ‘निर्मितिरंग’, ‘गप्पा-टप्पा’, ‘सौरभ’, ‘ग्रंथगप्पा’, ‘शहाणं पुस्तकवेड’ यांसारखी अनेक वाचकप्रिय सदरे ‘ललित’मधून प्रसिद्ध झाली/होत असतात. ‘पु. ल. देशपांडे’, ‘व्यंकटेश माडगूळकर’, ‘वसंत सरवटे’, ‘जी. ए. कुलकर्णी’, ‘केशवराव कोठावळे’, ‘गो. नी. दाण्डेकर’, ‘जयवंत दळवी’, ‘ठणठणपाळ’, ‘विंदा करंदीकर’, ‘कुसुमाग्रज’, ‘वि. स. खांडेकर’ यांसारखे संग्राह्य विशेषांक प्रसिद्ध केले. ‘ललित दिवाळी अंकां’ची मुखपृष्ठे गेली ४४ वर्षे श्री. वसंत सरवटे करीत आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ, वृत्तपत्र लेखक संघ यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार ‘ललित’ला मिळाले आहेत.